Tuesday, January 25, 2011

इंटरनेट टेलिफोनी

तुम्ही तुमचा जीमेल इबॉक्स सुरू केला की, त्याच्या डाव्या बाजूस इनबॉक्स, सेंट मेसेज आदी पर्याय असतात. त्याच्याच खाली आपल्या चॅट फ्रेंड्सची लिस्ट असते. या लिस्टच्यावर 'कॉल फोन' नावाचा एक पर्याय दिसेल. हा पर्याय म्हणजेच गूगलने सुरू केलेली नवी फोन सेवा. कॅनडा, अमेरिकेनंतर जगभरातील इतर भागात गूगल आता ही सेवा सुरू करत आहे. भारतात ही सेवा काही प्रमाणात सुरू करण्यात आली आहे.

याआधी गूगल चॅटवरी व्हाइस कॉलिंग नावाची सेवा उपलब्ध होतीच. मात्र यामध्ये आपल्याला केवळ आपण चॅट करत असलेल्या व्यक्तीशीच बोलता येत होते. मात्र या सेवेत असे होणार नाही. आपण फोनवरून जसे बोलतो तसे प्रत्यक्षात आपल्याला बोलता येणार आहे. आपण अगदी मोबाइल, लॅण्डलाइन कोणत्याही क्रमांकावर फोन करू शकणार आहोत. या सेवेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला जीमेलमध्ये दिसणाऱ्या 'कॉल फोन' या ऑप्शनवर क्लिक करावयाचे आहे. यानंतर तुमच्या कम्प्युटरमध्ये त्याचे सॉफ्टवेअर लोड झाले की, आपण या सेवेचा बिनदिक्कत फायदा घेऊ शकतो.

ही सेवा ऑगस्ट २०१०मध्ये कॅनडा आणि अमेरिकेत सुरू झाली. या दोन्ही ठिकाणी ही सेवा मोफत आहे. यानंतर हळूहळू ही सेवा जगातील विविध भागात सुरू करत असतानाच डिसेंबर २०१०मध्ये भारता आणली. याची अधिकृत घोषणा गूगलने अद्याप केली नसून प्रायोगिक तत्त्वावर ती सुरू करण्यात आली आहे. पुढील महिन्यात याची अधिकृत घोषणा होईल असे गूगलच्या ब्लॉगवर स्पष्ट करण्यात आले आहे. या सेवेसाठी लागणारे दर या सॉफ्टवेअर इन्स्टॉल करताना येत असलेल्या ऑप्शनमध्ये आपल्याला पाहवयास मिळतात. सध्या हे दर डॉलर्समध्ये असून भातासाठी ०.०६ डॉलर्स इतके आहेत. लवकरच रुपयांमधील यादी प्रसिद्ध करण्यात येईल असेही गूगलने स्पष्ट केले आहे. २०११च्या अखेरिस ही सेवा पूर्णपणे विनाशुल्क करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे ब्लॉगवर देण्यात आले आहे. या सेवेचा फायदा स्पष्ट करताना गूगलने म्हटले आहे की, यामध्ये फोनवर बोलताना कोणत्याही प्रकारचे अडथळे येत नाहीत. यामुळे बोलण्याची चांगली मज्जा लुटता येते. तसेच एकदा आपण या साइटवर रजिस्टर केले की, आपण डायल करत असलेल्या फोनची यादी यामध्ये सेव्ह होते. यामुळे आपल्याला वारंवार नंबर डायल करण्याची गरज पडत नाही. तसेच कॉल हिस्ट्री, एसएमएस अशा विविध सेवाही यामध्ये कालांतराने अॅड होणार आहे. या माध्यमातून गूगलने पुन्हा एकदा तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडी घेत 'इंटरनेट टेलिफोनी'चा अविष्कार भारतात आणला आहे. परंतु, सद्य स्थितीत ही सेवा परवडणे तसे कठीण आहे. मात्र रूपयांमधील दर जाहीर केल्यावर ते इतर कंपन्यांच्या कॉलपेक्षा स्वस्त असतील तर ते नक्कीच परवडण्या जोगे आहे.

No comments:

Post a Comment